
भाऊ रंगारी, नानासाहेब खाजगीवाले व घोटवडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याला लोकमान्यांनी ‘केसरी’तून जोरदार प्रोत्साहन दिले असले तरी तोवर लोकमान्यांनी स्वत: एखादे मंडळ, गणपती स्थापला नव्हता. ज्या वाडय़ात टिळक रहात होते त्या विंचुरकर वाडय़ात लोकमान्यांनी १८९४ साली गणेशोत्सवाची सुरुवात केली. टिळक येथे लॉ क्लासेस घ्यायचे, त्यामुळे सुरुवातीला हा ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखला जायचा. लोकमान्य विंचुरकर वाडा सोडून १९०५ साली गायकवाड वाडय़ात राहायला आले, तसे हा उत्सवदेखील त्यांच्याबरोबर गायकवाड वाडय़ात आला. लोकमान्यांचे वास्तव्य याच वाडय़ात अनेक वर्षे होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार हा उत्सव सांभाळण्याची जबाबदारी ‘केसरी’ संस्थेकडे देण्यात आली. स्वत:च्या राहत्या ठिकाणी टिळकांनी सार्वजनिक गणपतीला दिलेले हे स्वरूप अनेकांना प्रेरणा देणारे ठरले.
इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटे कि स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातुनकरण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, “आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?” [१८] त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवात अनेक प्रकारे साजरा केला जातो.
व्याख्यानमाला आयोजित करून तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळवून देणे
पौराणिक देखावे बनवून जनतेला संदेश देणे
जीवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे
विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे
समाज विधायक कामे करणे
अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, अशा शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना एक आदर्श व्यक्ती दिसली. याचा फायदा करून घेऊन टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीजयंतीची सुरुवात तर केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशभरात, विशेषतः बंगालमध्ये शिवाजीजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.परंतु आज गणेश उत्सवाला वेगळेच रूप आलेले आपल्य लक्ष्यात येते.
टिळकांनी नेमकं काय केलं?
गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपान चंद्रा यांचं मत आहे.
बिपान चंद्रा यांनी आपल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ या पुस्तकात म्हटलं आहे, “1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. 1896मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती.” “1904-05 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती. इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परवानगी लागायची, पण गणेशोत्सवात ती लागत नसे,”
1908 साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं, असं मत डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.
“टिळक तुरुंगात गेल्यावर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते, पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जात त्यातला भडकपणा कमी झाला होता,” असं मोरे सांगतात.
जून 1914ला ते मंडालेहून परत आले. त्यावेळी त्यांना कुणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता. त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांतच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील, अशी इंग्रजांना धास्ती होती. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती, अशी नोंद डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात आहे.
“लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवाचा टिळकांना फायदा होऊ नये, म्हणून गणपतीशिवाय इतरांचा जयजयकार करण्यास, त्यांचे वा त्यांच्या नातेवाइकांचे फोटो लावण्यास, प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे घालण्यास, भजनी मंडळीस वा मेळ्यास उद्देशून भाषणं करण्यास मनाई करण्यात आली. टिळकांना भाषणाची बंदी घालण्यात आल्यानंतर ते एक शब्द न बोलता कार्यक्रमास उपस्थित राहत असत. त्या परिस्थितीत ते देखील पुरेसं होतं,” असं मोरे यांनी लिहिलं आहे. पुढे त्यात लिहिलं आहे की गणपती मिरवणुकीदरम्यान काही उत्साही युवक ‘टिळक महाराज की जय’ म्हणत असत. त्यांच्यावर कारवाई देखील होत असे.
Date-22 August