मल्हारराव होळकर-एक जिगरबाज मराठा योद्धा

मल्हारराव होळकर ( १६ मार्च १६९३ – २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.धनगर कुटुंबात जन्मलेले मल्हारराव हे कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनले. तो काळच पराक्रमाचा  होता. तुमच्यातलं शौर्य तुमची ओळख बनत असे. हा योद्धा त्याच्या कर्तुत्वाने मराठा साम्राज्यातील एक महत्वाचा सरदार बनला. पेशवाई ज्यांनी आपल्या भक्कम हातांवर तोलून धरली त्या होळकर आणि शिंदे घराण्यापैकी होळकर घराण्याची स्थापना करणारा हा मूळ पुरुष. मल्हारराव होळकर हे अटकेपार झेंडा रोवाण्यापासून ते पानिपतच्या निर्णायक लढाई पर्यंत मराठा साम्राज्यासाठी लढत राहिले. एक महत्वाची व्यक्ती म्हणून इतिहास त्यांना कधीही विसरणार नाही.

दाभाड्यांचा सरदार कंठाजी कदमबांडे याच्या पेंढारी टोळीत मल्हाररावांनी शिपाई म्हणून काम केलं. याच काळात बाजीराव पेशवे आणि मल्हारराव यांची मैत्री झाली. यानंतर मल्हाररावांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी शिपाई ते थेट सरदार असा प्रवास केला. त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाली.

१७२८ ची निजामाबरोबरची महत्वाची लढाई असो किंवा १७३७ ची दिल्लीची लढाई असो, तसेच १७३८ सालची भोपाळची लढाई असो मल्हाररावांची समशेर कायम तळपत राहिली. त्यांचा दबदबा तयार झाला आणि त्यांना ‘किंग मेकर’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच काळात इंदोरची रियासत होळकर घराण्याकडे आली.

मराठा साम्राज्यातील एक सोनेरी पान म्हणजे ‘अटके पार झेंडा’. पाकिस्तानातील अटक पर्यंत भगवा झेंडा जाऊन पोहोचला होता. यात राघोबादादांबरोबर खांद्याला खांदा भिडवून मल्हारराव आघाडीवर होते. अटक काबीज करण्याआधी १७५८ साली सरहिंद आणि लाहौर देखील काबीज करण्यात आलं होतं. या नंतर एक म्हण मराठीत कायमची रुजली, ‘अटके पार झेंडा रोवणे.’

मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.

मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.

पानिपतचं युद्ध आणि मल्हाररावांच्या कारकीर्दीवर पडलेला डाग

१६ जानेवारी १७६१ साली पानिपतची लढाई झाली. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संक्रांत कोसळली. या महत्वाच्या लढाईत मल्हारराव पळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकांनी केला आहे. पण काही इतिहासकारांच्या मते जेव्हा पानिपत मध्ये पराभव स्पष्ट दिसत होता तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी त्यांच्या पार्वती बाईंना यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची विनंती मल्हाररावांकडे केली. त्यानुसार ते पार्वती बाईंना घेऊन निघून गेले. यानंतर सदाशिवराव भाऊ यांना मृत्यूने गाठले.  

या आरोपाबरोबर त्यांच्यावर आणखी एक आरोप केला जातो तो म्हणजे ज्या नजीब खानाने अहमदशहा अब्दालीला भारतात बोलावलं आणि पानिपत घडलं त्या नजीब खानाला मल्हाररावांनी आपला दत्तक पुत्र मानला होता. नजीब खानाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला माफ केलं. हाच नजीब खान पुढे जाऊन मराठा साम्राज्याच्या उरावर बसला होता.

पानिपत नंतर स्वराज्य पुन्हा उभारण्याच्या हेतूने त्यांनी अनेक मोहिमा आखल्या. तो पर्यंत नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चिरंजीव ‘माधवराव’ पेशवे झाले होते. या मोहिमांच्या धामधुमीतच आलामपूर येथे २० मे, १७६६ रोजी मल्हाररावांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वराज्य राखण्यात आणि ते वाढवण्यात मल्हाररावांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचा मोठा हात होता. अश्या या महान योद्ध्याला बोभाटाचा मनाचा मुजरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *